कृषी अधिकाऱ्यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी

आणे दि.५: जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले व राजगुरुनगर उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व बेल्हे मंडळ कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे यांनी संयुक्तपणे बेल्हे येथील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून कृषी केंद्रांची नियमित तपासणी केली जात असून, या पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी असतात तसेच या तपासणी द्वारे शेतकऱ्यांना खते, बियाणे दर्जेदार व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे व त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये याची खात्री केली जाते. याच अनुषंगाने बेल्हे येथील पाटील कृषी सेवा केंद्र व हिरापन्ना कृषी सेवा केंद्र, या कृषी सेवा केंद्राची तपासणी राजगुरुनगर उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, तसेच बेल्हे मंडळ कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे यांनी केली असून, यूरिया व इतर खतांचा साठा तपासणी केली. सर्वच कृषी सेवा केंद्रांना सूचना पत्र दिले. सर्व शेतकऱ्यांना चालू हंगामात युरिया व इतर खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत असताना, शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास प्रसंगी कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचीही कार्यवाही करण्यात येईल, असे तपासणी पथकाने सांगितले.

शेतकऱ्यांची गैरसोय तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे कृषी केंद्रांची नियमित तपासणी केली जात असून, बियाणे खरेदी करताना खरेदी बिल, जारी केल्याची तारीख अशी कागदपत्रे असल्याशिवाय बियाण्यांची विक्री करू नये अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने दिल्या असून, कृषी सेवा केंद्रांनी याचे पालन करावे. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बिलावर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, गाव, पिकाचे नाव व वाण, पूर्ण लॉट नंबर, भाव व शेतकऱ्याची स्वाक्षरी या बाबी नमूद करणे आवश्यक आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आदेश कृषी खात्याच्या तपासणी पथकाने सर्व कृषी सेवा केंद्रांना दिले आहेत. यावेळी बेल्हे कृषी पर्यवेक्षक प्रमिला मडके, तंत्र सहाय्यक प्रकाश पवार व राजगुरुनगर उपविभागीय कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक रोडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे