……नाहीतर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल- सदाभाऊ खोत

1 min read

सांगली दि.३:- गोपीचंद पडळकरांना मंत्री करा आणि मला राज्यपाल करा नाहीतर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांचं कौतुक केलं तर मंत्रिपदावरुन खुमासदार टोलाही लगावला.जिवाची बाजी लावणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात कुणाकडे असतील तर त्याचं नाव आमदार गोपीचंद पडळकर. पडळकरांच्या कार्यकर्त्यांना आज मी धन्यवाद देतो. लाख मेले तरीही चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे ही भावना मनामध्ये बाळगून तुम्ही जीव ओवाळून टाकणारे त्यांचे कार्यकर्ते झाला आहात. आमदार पडळकर यांच्याकडे सत्ता नव्हती तरीही कार्यकर्त्यांनी साथ दिली. जिवाची ढाल करणारे, बाजी लावणारे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत. असं सदाभाऊ खोत म्हणाले.गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे यासाठी संघर्ष केला. गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा माणूस आहे. योद्धा रणांगणात असेल तर त्याला बदनाम कऱण्याचा प्रयत्न होतो. देवाभाऊ पडळकर यांना मंत्री करतील याची मला खात्री आहे. पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल करा नाहीतर आम्ही बँडवाल्यांसारखे दिसू. बँडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवलं की लोक म्हणतात वन्स मोअर, होऊन जाऊदे पुन्हा. तशी आमची अवस्था झाली आहे. असं सदाभाऊ खोत त्यांच्या मिश्किल शैलीत म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.गोपीचंद पडळकर म्हणाले, “जयंत पाटील यांचं अजून तळ्यात मळ्यात चाललं आहे. कुठे जायचं ते अजून त्यांचं ठरत नाही. पण आपल्या विरोधात ताकदीने लढायचं हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे.” असाही टोला पडळकर यांनी लगावला. आता गट, पक्ष, विचार नाही असे म्हणत पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांनी डिवचले. दुसरीकडे भाजपा शिवाय देशाला, सांगलीला पर्याय नाही. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवू असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे