राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय;राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी
1 min read
मुंबई दि.२:- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली असून राज्यात केवळ ई-बाईक टॅक्सीला परवानगी असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.ई-बाइक टॅक्सीसाठी राज्य सरकारच्या वतीने दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे. तसेच कमीत कमी खर्चात प्रवाशांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सला मंजुरी देण्यात आली असल्याचा माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
कमी खर्चामध्ये चांगला प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र यामध्ये पेट्रोल बाइकला परवानगी देण्यात येणार नाही. तर केवळ इलेक्ट्रिक बाइकला परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्ण महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ५० बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. ई बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने ठरवलं आहे”, असंही सरनाईक यांनी नमूद केलं.
दरम्यान, या ई-बाईक टॅक्सीसाठी प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं सरनाईक म्हणाले. “यातल्या प्रवासी भाड्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याबाबतच्या निर्णयासंदर्भात आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत आलो आहोत.
आज धोरणाला मंजुरी मिळाली आहे. कमीत कमी दरांमध्ये प्रवाशांना रोजगार कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं ते म्हणाले.