कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर पिकअप- मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू
1 min readओतूर दि.१७:- उदापूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.
सोमनाथ शंकर बांगर (वय ३१, रा. काठेवाडी, कोपरे, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमनाथ बांगर हे सायंकाळी सहाच्या दरम्यान अहिल्यानगर कल्याण महामार्गावरून दुचाकीने ओतूरकडून उदापूरकडे जात असताना
हॉटेल निमंत्रणसमोर महामार्गावर समोरून येणाऱ्या भरधाव पिकअपची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या झालेल्या धडकेत सोमनाथ बांगर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरेश गेंगजे, एस. एस. भोते, श्यामसुंदर जायभाय व इतर पोलिसांच्या पथकाने अपघातस्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान सहाच्या सुमारास अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर खामुंडी गावच्या हद्दीत कार व दोन दुचाकींची धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. दोनही जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकूणच शनिवारी हा या परिसरात तीन अपघात झाले असल्याने शनिवार हा अपघाताचा दिवस ठरला आहे.