विरारमध्ये शिक्षिकेच्या घराला लागली आग, बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक; अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला?
1 min read
विरार दि.१२:- विरारमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षिकेच्या घरी घडली आहे. बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या काँमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन. जाणाऱ्या शिक्षिकेच्या घरात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे आणि या आगीत बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्या. या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, शिक्षिकेच्या निष्काळजी पणा विरोधात विध्यार्थी आणि पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. या शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते. मात्र त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले.
त्यांचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामान जळालंच पण त्यासोबत बारावीचे पेपरही जळून खाक झाले.बारावीची परीक्षा संपली असून आता मुलं निर्धास्तपणे रिझल्टची वाट पहात आहे.
भवितव्याचा हा प्रश्न असतो आणि त्यांचे सर्वस्वी भवितव्य हे मिळणाऱ्या गुणांवर अवलंबून असते. मात्र आता बोर्डाच्या पेपरची तपासणी करणाऱ्या शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्यांचे भवितव्य गोत्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच चक्क रिक्षा आणि एका बसमध्ये शिक्षक पेपर तपासत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आणि त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ झाल्याचे दिसून येत होते. पण आता याहीपलीकडे जात शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून सगळीकडे संताप व्यक्त होत आहे.