गुळुंचवाडी येथील गणेश पाझर तलाव कोरडा
1 min read
आणे दि.१३ (वार्ताहर):- गुळुंचवाडी येथील गणेश पाझर तलाव तसेच विठ्ठलदरा पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत.गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील सर्व ग्रामस्थांना शेतीसाठी बोअरवेल आणि विहिरींना याच दोन तलावांमधून पाण्याचा स्रोत आहे.
तलावात पाणी आहे तोपर्यंत शेतकरी वर्गाला मुबलक प्रमाणात पाणी शेतीसाठी उपलब्ध होत असते आता या दोन्ही पाझर तलावांचे पाणी पूर्णपणे संपलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गापुढे दुष्काळाचे संकट ओढावले असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या बोअरवेल व विहिरी तळाला जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोणताही शेतमाल शेतकऱ्यांना घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तसेच गुळुंचवाडी परिसरात शेतकरी शेतीसाठी पर्यायी जोडधंदा म्हणून दूध धंदा करतात.
आता तलाव आटल्यामुळे आणि विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होण्याचे चिन्ह दिसत आहे. दूध उत्पादनासाठी जनावरांना आवश्यक असणारा हिरवा चारा उपलब्ध होत नसल्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होत असल्याचे संतोष आग्रे यांनी सांगितले.