आनंद मेळाव्यातून मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी केली ३५ हजारांची उलाढाल

1 min read

बेल्हे दि.२४:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये फन फेअर (आनंद यात्रा) चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या यात्रेत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल व फनी गेम्स लावण्यात आले होते. विविध पदार्थ बनवण्यापासून ते तिकीट विक्री पर्यन्त सर्व कामे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पार पाडली. या मध्ये विक्री करून विद्यार्थ्यांनी ३५ हजार रुपयांची उलाढाल केली.

या यात्रा उत्सवाला पालकांनी गर्दी केली होती. मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनात भाज्या कापणे, एखादा पदार्थ बनवणे, बाजारातून वस्तू आणणे, त्याचा हिशोब ठेवणे, खरेदी – विक्री करणे याचे प्रत्यक्ष शिक्षण देण्यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या यात्रेत पाणीपुरी, छोले-बटुरे, वडापाव, भेळ, लिंबू सरबत, छास, टरबूज, मिठाई, दाबेली, लस्सी, कटलेट, भेळपुरी, सँडविच, जूस,लस्सी, पापड मसाला चायनिज भेळ अशा विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती.काही खाद्यपदार्थ विद्यार्थांनी घरून बनून आणले होते तर काही शिक्षकांच्या मदतीने शाळेत बनवण्यात आले.

या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सीईओ शैलेश ढवळे,प्राचार्या विद्या गाडगे,विश्वस्त दावला कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. माता पालक संघाच्या अध्यक्षा सीमा बोरचटे यांनी प्राचार्या तसेच सर्व शिक्षक यांचे हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विशेष आभार मानले. मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती व विद्यार्थ्यांच्या उत्साहात आनंद मिळावा पार पडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे