HSRP नंबर प्लेटबाबत सरकारकडून जनतेची दिशाभूल ? दुचाकीला सर्व खर्चांसहित सुमारे ‘इतक्या’ रुपयांचा पडतोय भुर्दंड
1 min read
पुणे दि.५:- HSRP नंबर प्लेटच्या दरांबाबत सध्या महाराष्ट्रात बरीच उलट-सुलट चर्चा सुरु असून यापार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या परिवहन विभागानं नुकताच या नंबर प्लेटच्या दरांबाबत खुलासा केला. पण हा खुलासा देखील जनतेची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत उघड झालं आहे. कारण केवळ अतिरिक्त जीएसटीचं नव्हे तर इतरही काही चार्जेस यामध्ये लावण्यात आल्यानं दुचाकीसाठीच्या नंबर प्लेटसाठी तब्बल 700 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. महाराष्ट्रासह देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे.
दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांना ही नंबर प्लेट लावण्याचे राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच आहेत. राज्यात दुचाकीसाठी जीएसटी वगळून HSRP नंबर प्लेटचा दर फिटमेंट चर्जेसह 450 रुपये आहे. पण यावर 18 टक्के जीएसटी लावला तर तो दर 531 रुपये होतो.
पण यामध्ये होम डिलिव्हरीचे चार्जेस 125 रुपये अधिकचे लावण्यात आले आहेत. त्यामुळं हे चार्जेस 531 + 125 = 656 रुपये इतके होतात. पण प्रत्यक्षात फिटमेंट चार्जेस आणि डिलिव्हरी चार्जेस एकत्र करुन त्यावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
त्यामुळं ही किंमत 678.50 रुपये इतकी होते. म्हणजेच शासनानं खुलासा करताना जीएसटी वगळून नंबर प्लेटचे चार्जेस 450 रुपये सांगितलेलं असताना प्रत्यक्षात ग्राहकांना ही नंबर प्लेट 678.50 रुपयांना पडते.