जागतिक विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव; विद्यानिकेतनमध्ये नाविन्य पूर्ण उपक्रम

1 min read

साकोरी दि.१:- जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यानिकेत इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी (ता.जुन्नर) येथे शालेय पातळीवर विज्ञान प्रदर्शन व चित्र व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना त्यांचे कलाविष्कार दाखविण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून चित्र व हस्तकला प्रदर्शन ही भरविण्यात आले. विज्ञान आणि चित्र व हस्तकला प्रदर्शनाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे ज्ञानदेव आतकरी, संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे तसेच विद्यालयाच्या प्राचार्या रुपाली पवार(भालेराव), उपप्राचार्य शरद गोरडे आणि उपस्थित पालक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर अध्यक्षनिवड करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे उपप्राचार्य शरद गोरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे ज्ञानदेव आतकरी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जपावा, याबद्दल मार्गदर्शन केले तसेच प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सोनवणे यांनी केले. प्रदर्शनात इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते. ध्वनीचे प्रवर्तन, मानवी श्वसन, उच्छ्वास यांचे प्रतिकृती असणारी फुफ्फुसांचे कार्य, ज्वालामुखी, वनस्पती वाढ, हवेच्या दाबावर चालणारी उपकरणे, पाण्याची घनता, हवा प्रदूषण रोखण्याकरीता वापरता येणारे तंत्रज्ञान यावर आधारित प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच, विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, सुक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. तक्ते लावण्यात आले होते. यासाठी विभागातील श्रध्दा वाघ, प्रतिभा गाडगे, प्रवीण अहिरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच एका बाजूला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, त्यामधे कागद, क्ले, पासून तयार केलेल्या विविध कलाकृती, चित्रे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, शोभेच्या वस्तू यासारख्या कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. यासाठी विद्यालयातील कलाशिक्षक विनोद उघडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात हिरीरीने सहभाग घेतला. या प्रदर्शनात शाळेतील पहिली ते नववीतील सुमारे २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रदर्शनात एकूण ५२ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी देखील घेतला. विशेष म्हणजे परिसरातील नजीकच्या शाळा त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा येथील विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होत्या. तेथील शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण दिवसभर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी ४ वाजता विज्ञान विभाग प्रमुख, तसेच विद्यालयाच्या प्राचार्या व उपप्राचार्य यांनी परीक्षण करून क्रमांक काढले व त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे यांनी देखील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे