पुण्यात आरटीईच्या ८० हजार ५९ जागा रिक्तच
1 min read
पुणे दि.२७:- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर आतापर्यंत २९ हजार २८ बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत. प्रवेशासाठी शुक्रवार (दि.२८) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अद्यापही आरटीईच्या ८० हजार ५९ जागा रिक्तच पडल्या आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावीच लागणार आहे.
आरटीई अंतर्गत राज्यातील खासगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतात. राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमधील १ लाख ९ हजार ८७ जागांसाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले होते. त्यातून या प्रवेश प्रक्रियेसाठी १ लाख १ हजार ९६७ बालकांची लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून पडताळणी करून प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. प्रवेश घ्यायला केवळ दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
फारच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी – मुदतवाढीची घोषणा करण्यात येणार – असल्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.