हर हर महादेव; राज्यात महाशिवरात्रीचा उत्साह; भाविकांची शिवमंदिरांमध्ये गर्दी
1 min read
नाशिक दि.२६:- महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. बम बम भोले चा जयघोष करत हजारो भाविक हे राज्यातील विविध मंदिरात दाखल झाले आहेत.
महाशिवरात्र हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस समजला जातो आणि त्याचनिमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.
संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण आहे. दर्शनाचे पुण्य घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पहायला मिळाली. पहाटे मंदिरात महादेवाची षोडषोपचारे पूजा संपन्न झाली. तर आता दिवसभर मंदिरात विविध धारमिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यासोबतच तीन दिवस संपूर्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे या चैतन्यमय वातावरणात सहभागी होण्यासाठी, पुण्याचा संचय करण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येताना दिसत आहेत.
दरम्यान पुण्याच्या भोरमधील नसरापूर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. बम बम भोले या अखंड गजरात, स्मरण करत बनेश्वर शिवमंदिर परिसर, महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुलला आहे. रात्री बारा वाजता मंदिरात भोरचे प्रांत अधिकारी विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी करण्यात दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.
दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यातं आलीय. दर्शनबारीसाठी मंडप, विज वितरण कंपनीच्या वतीने या भागातील
विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असुन आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेत मंदिर परिसरात आरोग्यपथक तैनात ठेवण्यातआल्या आहेत, वनविभागाच्या वतीने मंदिर परिसरात स्वछता राखण्यात येत आहे.