तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना; ८ मजूर अडकल्याची भीती

1 min read

हैदराबाद दि.:- तेलंगणातील अमराबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक मजूर जखमी झाले असून आठजण आत अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कार्यालयानं सोशल मीडियावर माहिती दिली आहे. की बांधकाम सुरु असलेल्या एसएलबीसी बोगद्याच्या छताचा एक भाग कोसळला आहे. त्यांनी लिहिलं आहे, “बोगद्याचं छत पडल्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, एसपी, अग्निशमन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आदेश मिळाल्यानंतर जलसंपदा मंत्री, सिंचन सल्लागार आणि इतर अधिकारी विशेष हेलिकॉप्टरनं घटनास्थळी रवाना झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पीटीआयनं माहिती दिली आहे की, दुर्घटनेच्या गांभीर्याचा अंदाज लावण्यासाठी बांधकाम करणाऱ्या कंपनीची टीम बोगद्यात गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधून घटनेचा आढावा घेतला. तसेच बचाव कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

शनिवारी (22 फेब्रुवारी) संध्याकाळी राज्याच्या पाटबंधारे मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, बोगद्यात अडकलेल्या आठ जणांना वाचवण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. हा बोगदा एसएलबीसी (श्रीशैलम लेफ्ट बॅंक कॅनाल) प्रकल्पाचा एक भाग आहे आणि तो नालगोंडा जिल्ह्यात बनवण्यात येतो आहे. या बोगद्याद्वारे श्रीशैलम प्रकल्पातून कृष्णा नदीचं पाणी नालगोंडा जिल्ह्यात पोहोचवलं जाणार आहे. तेलंगाणाचे जलसंपदा मंत्री उत्तम कुमार रेड्डी गेल्या वर्षी म्हणाले होते की 30 ट्रिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या या बोगद्यातून दररोज चार हजार क्युसेक पाणी नालगोंडा जिल्ह्यात पोहोचू शकणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे