शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्या; ‘या’ कारणामुळे उचलले टोकाचे पाऊल

1 min read

संगमेश्वर दि.२३:- संगमेश्वर नजीकच्या कसबा भेंडी येथील शाळकरी विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली आहे. आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग आल्याने आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मृण्मयी गजेंद्र देशमुख (वय-१३) या मुलीने आत्महत्या करून जीवन संपवले आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.गेल्या दोन वर्षापासून संगमेश्वर तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील येथील एक युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर संगमेश्वर जवळच्या कसबा येथील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संगमेश्वर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृण्मयी देशमुख हीला आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग आल्याने या रागाच्या भरात तिने घराच्या खोलीतील लाकडी भालाला गळफास घेत आत्महत्या केली. आईने हाक मारूनही मृण्मयी कुठे न दिसल्याने शोध घेतला ती घराच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.या घटनेची माहिती संगमेश्वर पोलीसांना देण्यात आल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व महिला पोलीस क्रांती सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याठिकाणी डाँक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर शाळकरी मुलीने शुल्लक कारणावरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे