उच्चशिक्षित महिला कमावती असल्याने जुन्नर न्यायालयाने पोटगीचा दावा फेटाळला
1 min read
जुन्नर दि.२१:- उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या महिलेने पोटगी मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, सदर महिला ही कमावती असल्यामुळे तिचा पोटगीचा दावा जुन्नर न्यायालयाचे न्यायाधीश ए. एच. बाजड यांनी फेटाळून लावला आहे. महिलेला पोटगी मिळविण्याचा हक्क असतानाही हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याची ही दुर्मिळ घटना आहे.
अर्जदार श्रुती व अजय (नावे बदलली आहेत) यांचा विवाह ४ मे २०२२ रोजी झाला होता. विवाहानंतर पती व पत्नी हे दोघेही विभक्त राहू लागले. पत्नीने पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दरमहा १५ हजार रुपये पोटगी मिळावी यासाठी जुन्नर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, पतीस दरमहा ४० हजार रुपये पगार तसेच इतर व्यवसायामधूनदेखील त्यास उत्पन्न मिळते. परंतु, अर्जदार ही उच्चशिक्षित असून ती नोकरीस आहे. अर्जदार महिलेचा सासरी छळ केला असून तिला घरामधून हाकलून दिले व जाब देणार यांच्या घरची परिस्थीती चांगली आहे.
त्यामुळे तिला दरमहा १५ हजार रुपये पोटगीचा आदेश व्हावा, अशी मागणी अर्जदार महिलेच्या वकिलांनी केली होती.जाब देणार पती यांच्या वतीने अॅड. तुषार पाचपुते यांनी युक्तिवाद करताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, अर्जदार पत्नीने केलेला कौटुंबिक छळाचा आरोप चुकीचा असून सर्व आरोप पुराव्याचा भाग आहे.
दोघांमधील पती-पत्नीच्या नात्याबद्दल कोणताही वाद नाही. पत्नी ही केवळ सात महिने सासरी राहिलेली आहे. स्वतःचे शिक्षण बी फार्म झाले असून ती नोकरी करत आहे. सदर केस ही गुणदोषावर चालवून घेणे हे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक असल्याने पोटगीचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली.
न्यायालयाने अंतरिम अर्ज निकालात काढताना प्रथमदर्शनी असे दिसते की, अर्जदार पत्नी हिला उत्पन्नाचे साधन आहे आणि पत्नीला जर उत्पन्नाचे साधन असेल तर ती तिच्या पतीवर उदरनिवार्हाकरिता अवलंबून राहू शकत नाही. तसेच पत्नीने तिच्या पतीवर केलेले कौटुंबिक छळाचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे अर्जदार पत्नी ही अंतरिम पोटगी मिळण्यास अपात्र असल्याने तिचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.