दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू

1 min read

नवीदिल्ली दि.१६: -दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवार दि.१५ सायंकाळी महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि 16 वर मोठी गर्दी जमा झाली आणि यात झालेल्या चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी आहेत. महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीरा धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 वर मोठी गर्दी जमा झाली होती.

त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली. त्यातून गाडीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना 10 लाख, गंभीर जखमी झालेल्यांना 2.5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना एक लाख निधी दिला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी करून दिलेल्या माहितीनुसार, “प्रयागराज एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक १४ वर उभी असताना, प्लेटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. स्वतंत्रा सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी लेट होती.

या रेल्वेचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर होते. रेल्वेने दर तासाला CMI च्या हिशेबाने १५०० जनरल टिकटांची विक्री केली. यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.

दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये प्राण गमावलेल्या लोकांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला. ज्यामध्ये ते म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे.

ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत माझे विचार आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.” ते म्हणाले की अधिकारी या परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांना मदत करत आहेत. पीएम मोदींशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे