“जगातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम”, प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, भाविक तासनतास खोळंबले!

1 min read

प्रयागराज दि.११:- पाच तास प्रवास करून अवघं पाच किलोमीटर अंतर पार करता आल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ही पोस्ट महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजच्या दिशेनं निघालेल्या एका भाविकानं शेअर केली असून सध्या भाविक कदाचित जगातल्या सर्वात मोठ्या ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत. असंही या युजरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये संबंधित नेटकऱ्यानं या ट्रॅफिक जामचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे महाकुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि गंगेत पवित्र स्नान करण्याच्या आशेनं निघालेल्या भाविकांवर तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ ओढवली आहे.गेल्या तीन आठवड्यांपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रोज लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत. गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी सध्या प्रयागराजमध्ये लोटल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रयागराजमधील सोयी-सुविधांवर मोठा ताण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी होऊन तिथे जीवितहानीही झाली होती. त्यामुळे महाकुंभच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमधील सोयी-सुविधांची मोठी चर्चा होत असताना आता प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर कैक किलोमीटर लांबपर्यंत अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल दरम्यान, भास्कर शर्मा नावाच्या व्यक्तीने आपल्या एक्स अकाऊंटवरून सोमवारी पहाटे ४ वाजता केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये संबंधित व्यक्तीने प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीबाबत ८ फेब्रुवारीपासूनच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यातली शेवटची पोस्ट सोमवारी १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ च्या सुमारास केली असून त्यात ‘जगातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीत’ अडकल्याचा उल्लेख केला आहे. “महाकुंभमेळ्यात जगातल्या सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीत मी अडकलो आहे. जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. प्रयागराज या वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे बंद झालं आहे. पाच तास प्रवास करून मी फक्त पाच किलोमीटर पुढे जाऊ शकलेलो आहे. आत्तापर्यंत तर मी लखनौमध्ये असायला हवं होतं. ही अतिशय ढिसाळ अशी वाहतूक नियोजन व्यवस्था आहे. या गोंधळामुळे मला माझं विमानाचं तिकीट रद्द करून नव्याने बुकिंग करावं लागलं”, असं भास्कर शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मध्य प्रदेशमधील रस्ते वाहतूक कोंडीमुळे झाले बंद! दरम्यान, मध्य प्रदेशमधून प्रयागराजच्या दिशेनं जाणारे अनेक रस्ते हे अशाच प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जवळजवळ बंदच झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मध्य प्रदेशातील काही भागात अनेक वाहनांना परत फिरून कटनी आणि जबलपूरला जाण्याचे निर्देश देण्यात आले. तर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांमधील प्रवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची विनंती केली आहे. सोमवारनंतर वाहतूक सुरू करण्यात येईल, असंही पोलिसांनी प्रवाशांना सांगितलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे