हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
1 min read
मुंबई दि.१४:- काँग्रेसने अखेर प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. नाना पटोले यांच्या जागी ते आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. बड्या चेहऱ्यांना संधी न देता काँग्रेसने महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबले आहे. प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र यांच्याऐवजी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना गेले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
तसेच गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे सहकारी ते मानले जातात. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्य पदाच्या शर्यतीत अनेक नावे होती. यामध्ये कोल्हापूरचे सतेज पाटील, लातूरचे अमित देशमुख, सांगलीचे विश्वजित कदम यांची नावे देखील होती. मात्र, अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे.
सपकाळ यांची गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनाच्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रीय झाले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी. कॉम व बी. पी. एड पदवी घेतली आहे. ते शेतकरी कुटूंबातून आलेले आहेत. सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात ते पहिल्यापासून कार्यरत होते. महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलं. आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी ही त्यांनी पेलली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.