भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद

1 min read

नारायणडोह दि.१३:- नारायणडोह परिसरात (ता.अहिल्यानगर) ट्रकचालकाचा गळा कापून ट्रक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळुंज बाह्यवळण नारायणडोह परिसरात आज (मंगळवारी) घडली. ओसवाल इम्पिरियल चव्हाण, साहेबा आनंदा गायकवाड असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर अनोक सिंह असे मयत व्यक्तीचे नाव आहे.राजस्थान येथील मालवाहतूक ट्रक घेऊन वाळुंज बाह्यवळण नारायणडोह येथून जात असताना दोन व्यक्तींनी ट्रक लुटण्याच्या उद्देशाने ट्रक चालकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोघा संशितांनी ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला. यात ट्रक महावितरणच्या विद्युत खांबांला धडक दिला. त्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघे संशयित हे पळून जाण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकने पळत होते. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे