राज्यात आजपासून बारावीची परीक्षा; १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षा देणार
1 min read
पुणे दि.११:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. १८ मार्च रोजी अखेरचा पेपर होणार आहे. राज्यात १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे.कॉपी बहादरांवर बोर्डाची करडी नजर असेल. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके असतील.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण दहा हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून आठ लाख १० हजार ३४८ विद्यार्थी, सहा लाख ९४ हजार ६५२ विद्यार्थिनी, आणि ३७ तृतीयपंथी यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील तीन हजार ३७३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. विज्ञान शाखेला सात लाख 68 हजार 967 विद्यार्थी,
कला शाखेला तीन लाख 80 हजार 410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी, टेक्निकल सायन्स 4 हजार 486 असे एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आज दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत.
यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत. इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या
उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी कळविली आहे.