कांद्याच्या १७ गोण्याला मिळाले ५२ रुपये; बळीराजा दुहेरी संकटात

1 min read

अहमदनगर दि.१८:- चार महिने शेतकऱ्याने सांभाळलेला कांदा काढून बाजार समितीत विकण्यासाठी आणला. मात्र १ रुपया भाव मिळाल्याने १७ कांदा गोण्यांचे हातात अवघे ५२ रुपये पडले. शेतात पिक करुनही पदरात काहीच पडत नसल्याने आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यामधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, एकीकडे कांद्याला बाजार नाही आणि दुसरीकडे सरकारने प्रतिक्विटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु, जाचक अटींमुळे ते शेतकऱ्यांच्या पदरात पडेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरीही दुहेरी संकटात सापडला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील खडकी येथील शेतकरी गोवर्धन आप्पासाहेब वाडेकर यांनी १७ गोण्या कांदा गुरुवारी (दि.१३ ) नेप्ती उपबाजार समिती, नगर येथे विक्रीसाठी आणला होता. भाडे, हमाली, मापाई व इतर खर्च वजा जाता त्यांच्या हातात ५२ रुपयांची कांदा पट्टी आडत्याने टेकवली. कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भावच नसल्याने काही शेतकऱ्यांनी काद्यात ट्रक्टर फिरवला आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून नगर तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

गारपीट व वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारी यंत्रणा अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली नाही. त्यातच काढणीला आलेला कांदा शेतकरी काढून बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, कांद्याचे भाव ७०० ते ६०० रुपयांपर्यंत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात नाममात्र पैसे मिळत आहेत. त्यातच अनेक शेतकऱ्यांचा कांदा गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने खराब झाला आहे.
दोन पैसे मिळतील या आशेपाटी काही शेतकरी कांदा बाजार आणत आहेत. परंतु, त्यांच्याही पदरात काही पडत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे