मातोश्री फेस्टिव्हल पर्व 2k25 मध्ये विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

1 min read

कर्जुले हर्या दि.१०:- मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित आयुर्वेद, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालय तसेच मातोश्री ग्लोबल स्कुल व ज्युनिअर कॉलेज चा दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात व मोठया जल्लोषात संपन्न झाला.

मातोश्री संकुल हे उत्कृष्ट विद्यार्थी व समाजभान जपणारे दर्जेदार नागरीक घडविणारे उत्तम संस्कारपीठ असल्याचे प्रतिपादन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केले.पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना संबोधित होते. खडकाळ माळरानावर विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच आहेर कुटुंबियांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोदगार पारनेर चे आमदार काशिनाथ दाते यांनी काढले.
मातोश्री शैक्षणिक संकुलातील विविध अभ्यासक्रम व उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार व मनमोहक कार्यक्रम सादर केले व येथील शिक्षणाचा दर्जा उच्च प्रतीचा असल्याचे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी हिंदी व मराठी गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मातोश्री शैक्षणिक संकुल गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन परिपूर्ण नागरीक घडविणारे महत्वाचे केंद्र असल्याचे मत पारनेर तालुका शिवसेना प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संकुलातील विद्यार्थ्यांनी गौरव महाराष्ट्राचा ही थीम घेऊन विविध नृत्यप्रकार, नाटिका, लोकगीते, लोककला, पोवाडे, शिवराज्याभिषेक सोहळा, विनोदी व प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले व उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले. दोन दिवस संस्थेच्या माध्यमातून उपस्थित प्रमुख पाहुणे, पालक व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शैक्षणिक, राजकिय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडू, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व सेवकांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा मीरा आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर, सचिव किरण आहेर, संचालक लक्ष्मण आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, संचालिका डॉ श्वेतांबरी आहेर व शितल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे