हवेत गोळीबार करणारे तिघे जेरबंद
1 min read
शिर्डी दि.९:- शिर्डी परिसरात हवेत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गणेश आप्पासाहेब शेजवळ, अजय रत्नाकर शेजवळ, भाऊसाहेब साहेबराव जगताप (सर्व रा, शिर्डी, ता. राहाता) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत त्यांना पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शिर्डी परिसरात हवेत गोळीबार करून दहशत पसरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार गणेश शेजवळ हा दहशत पसरवत असल्याचे समजले.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने त्याचा शोध घेतला असता त्याने त्याच्या चुलत भावाकडे गावठी कट्टा ठेवला, असे तपासत समोर आले. पथकाने अजय शेजवळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसे व 3 रिकामी काडतुसे हस्तगत करण्यात आली.