बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; लघुशंकेसाठी गेलेल्या मुलावर बिबट्याची झडप
1 min read
ओतूर दि.१७:- शेतात लघुशंकेसाठी गेलेल्या शेतमजूराच्या १२ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ओतूर (ता.जुन्नर) वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
रविवारी (दि.१६) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. या दुर्घटनेत संजीव बाशीराम झमरे (वय १२, रा. टेमला राजपुर, ता. राजपुर, जि. बिडवाणी, मध्यप्रदेश) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
बाशीराम जालू झमरे हे त्याच्या कुटुंबासह मध्यप्रदेशमधून ओतूर येथे कांदे काढणी कामासाठी इतर शेकडो मजुरासोबत आलेले आहेत. जाकमाथा येथील पांडुरंग ताजने (रा. ओतूर, ता. जुन्नर) यांचे शेतात ही बिबट हल्ल्याची दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती राजेश पांडुरंग वाघ यांनी वनविभागाला कळविली.
जुन्नरचे सहायक वनसंरक्षक अमित भिसे यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. काकडे, वनरक्षक पी. के. खोकले, के. एस. खरोड़े, फ़ुलचन्द खंडागळे, साहेबराव पारधी आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाचे शव ताब्यात घेतले व जून्नर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.