शेतीसाठी वरदान ठरणार फुले मेटाऱ्हायझियम बुरशी:- डॉ. संतोष मोरे
1 min read
पुणे दि.६:- बुरशी म्हटले कि शेतकऱ्यांना वाटते कि शेतीसाठी अपायकारक असलेले कीटक. अपुऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना हे माहितीच नाही कि ज्या प्रमाणे पिकांवर शत्रूजीवी बुरशी किंवा कीटक असतात तसेच मित्रजीवी कीटक पण असतात.मित्रजीवी बुरशी ही शेतीसाठी अपायकारक असणाऱ्या शत्रूजीवी किटकांचा आणि बुरशीचा नायनाट करत असते. शेती क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये किडनियंत्रणासाठी वाढलेल्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे किडींमध्ये प्रतिकार क्षमता विकसित होत आहे. परिणामी शेतीसाठी घातक असणाऱ्या मुख्य आणि दुय्यम किडींचा उद्रेक वाढत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतेच त्याचबरोबर जमिनीची सुपीकता पण कमी होत आहे. म्हणूनच या शत्रूजीवी किडींच्या नियंत्रणासाठी मित्रजीवी म्हणजेच जैविक घटकांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. या अति विषारी कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे शेतीसाठी उपयोगी अशा अन्य मित्र कीटकांचा नाश झाल्याने नैसर्गिक नियंत्रण साखळी नष्ट होत आहे.
जैविक किड नियंत्रण हा त्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. आपल्याला बुरशी म्हटले की दरवेळी पिकांवरील विविध रोगच आठवतात पण त्या निसर्गामध्ये विविध पर्यावरणपूरक कामे करत असतात. यातीलच एक महत्वपूर्ण बुरशी म्हणजे मेटारायझियम ॲनिसोपिली.
या बुरशीमुळे कीटकांमध्ये ग्रीनमस्कार्डिन हा साथीचा रोग होतो. सदर बुरशी जवळपास 200 पेक्षा अधिक कीड प्रवर्गातील निरनिराळ्या किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणारे कृषि महाविद्यालय पुणे येथे अखिल भारतीय समन्वित जैविक किड नियंत्रण प्रकल्पांतर्गत डॉ. संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विनय चव्हाण,
सुदीप दळवे, रोहन नांदखिले, रेणुका निमसे व सहकारी विद्यार्थ्यांनी याच बुरशी पासून एक जैविक कीडनाशक फुले मेटाऱ्हायझियम तयार केले असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मेटाऱ्हायझियमचा वापर हुमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे, इ. किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो.
प्रामुख्याने, ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी, इ. खरीप हंगामातील पिकांबरोबर विविध पालेभाज्या आणि फळबागांवर सुद्धा हे कीटकनाशक उपयुक्त आहे . मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझियम हे प्रभावी जैविक कीडनाशक आहे.
हुमणी अळी ही बहुभक्षी किड आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये, पावसाळ्यात ऊस पीकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि त्यामुळे ऊस पीकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. मेटाऱ्हायझियमच्या संपर्कात आलेली हुमणी अळी साधारण दहा पंधरा दिवसांत मरते.
या बुरशीमुळे शेती विश्वात अमूलाग्र बदल होऊन शेतकऱ्यांसाठी ही बुरशी वरदान ठरणार आहे. प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी व उत्पादनांची खरेदी करण्यासाठी संपर्क:-डॉ. संतोष मोरे (७५८८९५५५०१)(प्राध्यापक, कृषी महाविद्यालय पुणे).