नारायणगाव पोलिसांची चोरट्यांवर करडी नजर; प्रवासी ज्येष्ठ महिलेचे चोरीला गेलेले दागिने एक तासातच परत मिळवून देण्यास नारायणगाव पोलिसांना यश

1 min read

नारायणगाव दि.२९:- येथील बस स्थानकातून ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरी केलेले सुमारे साडेतीन तोळे वाजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा 2 लाख 66 हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. चोरी झाल्यानंतर अतिशय गतिमानतेने तपास करून अवघ्या एक तासाच्या आत पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या व मुद्देमाल जप्त केला.पोलिसांच्या या कामगिरीविषयी ग्रामस्थ व प्रवाशांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गेलेले दागिने तातडीने परत मिळाल्याने ज्येष्ठ महिलेला अश्रू अनावर झाले. पोलिसांच्या रूपात देव भेटल्याची भावना ज्येष्ठ महिलेने व्यक्त केली. या प्रकरणी संध्या संतोष शेंडे (वय 45 रा. वर्धा, जिल्हा वर्धा) या महिलेला अटक करण्यात आली आहे.जुन्नर येथील पुष्पा रामदास दिवेकर (वय 59 ) ही ज्येष्ठ महिला आज दुपारी पती समवेत उपचारासाठी पुणे येथील वायसीएम रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवासात चोरीच्या भीतीने त्यांनी आपले मंगळसूत्र व सोन्याची अंगठी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ही पिशवी पर्स मध्ये ठेवली होती.आज दि.28/01/2025 रोजी दुपारी 02/00 वाजण्याच्या सुमारास त्या नारायणगाव बस स्थानकात पुणे येथे जाण्यासाठी बस ची वाट बघत पती समवेत उभ्या असताना त्यांच्या खांद्यावर असलेल्या पर्स मधील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तातडीने नारायणगाव पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नारायणगाव येथील बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पुष्पा दिवेकर यांच्या मागे एक महिला सतत फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही महिला पुणे नाशिक एसटी बस मध्ये बसली असल्याचे लक्षात आले. या महिले बाबत संशय आल्याने या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज व एस.टी चा क्रमांक आळेफाटा पोलिसांना देण्यात आला. दरम्यान फौजदार सोमशेखर शेटे, पोलीस हवलदार मंगेश लोखंडे, महिला पोलीस हवालदार सुवर्णा गडगे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, पोलीस मित्र मुनाफ पिंजारी, विजय नेहरकर यांनी एसटीचा पाठलाग सुरू केला.आळेफाटा पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते यांच्या मदतीने नाशिक कडे निघालेली एसटी बस आळेफाटा जवळ पुणे नाशिक महामार्गावर थांबवली. संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेची झडती हवालदार सुवर्णा गडगे यांनी घेतली असता चोरीचे दागिने त्यांच्याकडे आढळून आले. याप्रकरणी संध्या संतोष शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता तळपाडे हे करीत आहेत. सदरची चोरी सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने उघडकीस आल्याने नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार यांचेकडून नागरिकांना आपापल्या गावामध्ये तसेच गृहनिर्माण सोसायटी व महत्त्वाच्या ठिकाणी सिसीटीव्ही बसवणे बाबत आव्हान करण्यात आले आहे. तरी असे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून सूचनांचे पालन करावे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिसांना सहकार्य करावे व स्वतःचे घर, गाव सुरक्षित करावे अशा सुचना पोलिसांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे