सलग दोन षटकार, प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी; तरुण सरसावला अन् कोसळला; मैदानातच तरूण क्रिकेटरचा करुण अंत
1 min read
वसई दि.२८:- पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्यानंतर सलग तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकताना तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वसई तालुक्यातील कोपर गावात राहणाऱ्या २७ वर्षीय सागर वझेच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्तम फलंदाजी करणारा तरुण अशी सागरची पंचक्रोशीत ओळख होती. क्रिकेटवर त्याचं अतिशय प्रेम होतं. पण क्रिकेट खेळतानाच नियतीनं त्याच्यावर घाला घातला. वसई तालुक्यातील कोपर गावात राहणारा सागर वझे उत्तम क्रिकेट खेळायचा. शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेटचा सामना रंगला होता.
त्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत सलग दोन षटकार ठोकले. त्यानंतर प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी होऊ लागली. तिसरा षटकार ठोकण्यासाठी सागर पुढे सरसावला. तो क्रीझबाहेर आला. तो तिसरा षटकार माळणार इतक्यात त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला.
त्यामुळे तो जागीच कोसळला. फलंदाजी करताना कोसळलेल्या सागरच्या मदतीसाठी सगळ्याच खेळाडूंनी धाव घेतली. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तरुण वयात क्रिकेट खेळताना सागरचा अकाली मृत्यू झाला.
त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सागरचा खेळ यापुढे पाहता येणार नाही, असं म्हणत परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनी शोक व्यक्त केला.क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला सागर वझेला डॉक्टरांनी दिला होता. पण खेळावरील प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळेच तो शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेट खेळायला मैदानात उतरला.
आवडता खेळ खेळत असतानाच सागरनं जीव गमावला. सागर वझेच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे. तरुण वयात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याची भावना परिसरातील क्रिकेटप्रेमी व खेळाडूंनी व्यक्त केल्या.