चिकन, अंडी खाणे १००% सुरक्षित असल्याचा पशुसंवर्धन विभागाचा खुलासा

1 min read

नांदेड दि.२८:- नांदेड जिल्ह्यात बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.नादेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील केवळ किवळा या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या ठिकाणी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्डफ्लूची लागण नाही, असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केला आहे.किवळा या गावी साधारणता 20 तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्षांमध्ये मृत पक्षी आढळून आल्याने त्याचे नमुने राज्य व राष्ट्रीयस्तरीय प्रयोग शाळेत निदानासाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेतील बर्डफ्लूसाठीचे नमुने पॉझिटिव्ह दिसून आल्यानंतर या गावामधील 1 किमी परिघाच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. त्यामध्ये साधारणपणे 382 मोठे पक्षी आणि 74 छोटे पक्षी असे एकूण 456 पक्षी नष्ट केले आहेत. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे.त्याचबरोबर संसर्ग झालेल्या 1 किमी क्षेत्राबाहेरील बाधित क्षेत्राच्या 10 किमीपर्यंत सर्तकता क्षेत्र घोषित केले आहे. त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत त्याचे नमुने दर 15 दिवसाला पुढील 3 महिन्यांपर्यंत प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे निदान केले जाणार आहे. त्या पक्षांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर त्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे