एसटीचा प्रवास आजपासून महागला; महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री लागणार
1 min read
मुंबई दि.२५:- सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्याभाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास आता महागणार असून एसटी दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्याआधी एसटी दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह मुंबईमधील प्रवाशांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. हे नवे दर कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती.मात्र आता हे नवे दर आजपासूनच लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे राज्य परिवहन खात्याने एसटी दरवाढ केल्यानंतर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढही होणार आहे. गेल्या काही वर्षापासून टॅक्सी आणि रिक्षा यांची भाडे वाढली नाहीयेत त्यामुळे ३ रूपयांनी भाडेवाढ करण्याची मागणी होती. ही भाडेवाढ होणं गरजेचं आहे नाहीतर आमचं जगणं मुश्किल होईल असं टॅक्सी रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.
त्यानुसार आता टॅक्सी आणि रिक्षाचाही प्रवास महागला आहे. टॅक्सी आणि रिक्षामध्ये तीन रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. टॅक्सी सध्याचे दर हे 28 रुपये आहेत तर आता नव्या दरवाढीनुसार ते 31 रुपये होतील.
तसेच रिक्षाचे सध्याचे दर हे 23 रुपये असून नव्या दरवाढीनुसार 26 रुपये मोजावे लागणार आहेत. दोन फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ होईल अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.