१७ ते २२ एप्रिल दरम्यान रंगणार नारायणगावची यात्रा; सर्व तमाशा कलावंत मोफत सादर करणार कला
1 min readनारायणगाव, दि.१०:- ग्रामदैवत श्री मुक्ताबाई व काळोबा देवस्थान यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दि. १७ ते २२ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेच्या कालावधीत तमाशा कलावंत ग्रामदैवताची सेवा म्हणून आपली कला मोफत सादर करतात. दरम्यान, यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सुजित खैरे, एकनाथ शेटे व संतोष वाजगे यांची एक मुखाने निवड करण्यात आली आहे.
श्री मुक्ताबाई व काळोबा देवस्थानची उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठी भरणारी यात्रा म्हणून ओळखली जाते. यात्रेचे संपूर्ण नियोजन करण्याची आगळीवेगळी परंपरा असून संपूर्ण निर्णय गाव पातळीवर ‘कांबळा बैठकीत घेतले जातात. श्री हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा परंपरेनुसार श्री मुक्ताबाई व काळोबा यात्रेच्या नियोजनासाठी गाव बैठक भरते त्याला कांबळा बैठक असे म्हटले जाते.
श्री मुक्ताबाई व काळोबा यात्रेच्या नियोजनासाठी कांबळा बैठक भरविण्यापूर्वी मुक्ताबाई मंदिरातून आई मुक्ताबाईची प्रतिमा नारायणगावचे ग्रामस्थ वाजत-गाजत कांबळा बैठकीपर्यंत घेऊन येतात. सर्वांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून पेढ्याचा प्रसाद वाटण्यात येतो. त्यानंतर एकत्रित चर्चा करून एकमुखी निर्णयाने यात्रा उत्सवाचे संपूर्ण नियोजन करण्यात येते. यावर्षी हाउसिंग सोसायटींकडून वर्गणी घेण्यात येणार असून, वर्गणीत १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या कांबळा बैठकीस नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, एकनाथ शेटे, संतोष वाजगे, अजित वाजगे, विलास पाटे, अशोक पाटे, रामदास अभंग, आशिष वाजगे, कैलास पानसरे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, जयेश कोकणे, गणपत कोकणे, प्रल्हाद पाटे, रामभाऊ तोडकरी, विकास अडसरे, अरिफ आतार, राजाराम पाटे, समीर म्हेत्रे, आशिष फुलसुंदर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.