५ जुलैचा मोर्चा आता निघणार नाही- संजय राऊत
1 min read
मुंबई दि.३०:- राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीवरुन एक पाऊल मागे घेतलं आणि दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर आता ठाकरे बंधुंच्या मोर्चाचे काय होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ५ जुलैचा मोर्चा आता निघणार नाही, असं ट्विट केलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द. हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय. छान)
ठाकरे बंधुंच्या 5 जुलै रोजीच्या मोर्चाच्या निमित्ताने मराठी माणसाची ताकद दिसणार होती. पण राज्य सरकारने हिंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं होतं. त्यावर संजय राऊतांनी सर्व चित्र स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चाही रद्द करण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले. पण मनसेकडून मात्र यावर अद्याप अधिकृत माहिती आली नाही.
