नारायणगाव अपघात प्रकरणी ट्रकचालकास ३ दिवस पोलीस कोठडी; एसटी चालकास १४ दिवस न्यायालयीन कोठडी

1 min read

नारायणगाव दि.१९:- नारायणगाव (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी (दि.१७) झालेल्या एसटी बस, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सिमो व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघाता नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आयशर ट्रक चालक रोहितकुमार जगमाल सिंग याला तीन दिवसांची पोलीस कोठडी तर एसटी बस चालक भाऊसाहेब भास्कर गायकवाड यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.अपघातातानंतर जखमी झालेल्या सात रुग्णांना नारायणगाव येथील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका रुग्णाला नातेवाइकांच्या सांगण्यावरून उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरित सहा रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित चार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, तस्लिम वसीम इनामदार व्हेटीलेटर असून गणपत बजाबा घाडगे, आलिशा समीर शेख यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी ऋतुजा भरत पवार यांची प्रकृती सुधारत असल्याचे मॅक्स केअर रुग्णालयातील डॉ. प्रतीक पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे