बिबट्याला कोंडून घेणाऱ्या मोहितला शौर्य पुरस्कार
1 min read
मालेगाव दि.१५:- येथील मोहित विजय अहिरे हा १३ वर्षीय मुलगा मोबाईलवर खेळत असताना अचानक बिबट्या मंगल कार्यालयात शिरतो. बिबट्याला पाहून काहीही न घाबरता अत्यंत शांतपणे तो जागेवरून उठतो आणि अलगद कार्यालयाचा दरवाजा लावून घेत बिबट्याला कोंडून घेतो. ६ मार्च २०२४ मधील ही घटना संपूर्ण राज्यात गाजली होती. या मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले. याच मोहितला आता शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड वेल्फेअर यांच्यावतीने या पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली.
मोहितने दाखविलेल्या धाडसामुळे बिबट्या जेरबंद झाला. मात्र, बिबट्याला पाहूनही ज्या धैर्याने आणि संयमाने त्याने समयसूचकता दाखविली त्याबद्दल मोहित कौतुकास पात्र ठरला होता. सर्व माध्यमांनी त्याच्या या धाडसाचे कौतुक केले होते. याच मोहितला आता गौरविण्यात येणार आहे.
येत्या २७ जानेवारी रोजी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार असून त्यादृष्टीने मोहित यास आमंत्रित करण्यात आले आहे.मालेगावमध्ये हा चित्तथरारक प्रसंग घडला होता. मालेगाव-नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात
मोहित अहिरे हा १३ वर्षीय मुलगा मोबाइलवर गेम खेळत बसला असताना अचानक बिबट्या दरवाजातून आत आला समोर बिबट्या चालत गेल्याचे पाहून जराही विचलित न होता मोहितने त्यास कोंडून घेतले होते.