पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला ब्रेक नको, वळण घ्या:- डॉ. प्रविण डुंबरे

1 min read

पुणे दि.१५:- पुणे-नाशिक या होऊ घातलेल्या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला जीएमआरटीमुळे ब्रेक, अशी बातमी नुकतीच वाचनात आली. आणि तो मार्ग ‘पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा करण्यात आला आहे,’ असे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या वक्तव्यावरून समजते. खोडद, तालुका-जुन्नर येथे तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला रेडिओ तरंग लहरींचा हा अवकाशीय अभ्यासासाठीचा जगप्रसिद्ध महाकाय प्रकल्प, जुन्नर तालुक्यासाठी अभिमानास्पद नक्कीच आहे. परंतू जीएमआरटीमुळे या भागात अद्याप पर्यंत मोठी एमआयडीसी आली नाही, आणि आता तर पंचवीस वर्षांपासून येणार येणार म्हणत असलेली रेल्वे सुद्धा नाही. केवळ राजकारणामुळे, खेडमध्ये येत असलेले विमानतळही पुरंदरला हलवले गेले आहे. असे मत ओतूर येथील डॉ. प्रविण डुंबरे, यांनी व्यक्त केले आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुक्याची निवड कागदोपत्री जाहीर झाली आहे. उसाच्या वाढलेल्या शेतांमुळे आणि त्यातील लपणीमुळे या भागात बिबट्यांची संख्या आणि त्यांचे हल्ले गावोगाव वाढले आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे कित्येक जण तर मृत्युमुखी सुद्धा पडले आहेत. शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. जुन्नर मध्ये जाहीर झालेल्या बिबट सफारी प्रकल्पाला तर अद्यापि सुरुवातही झालेली नाही.सह्याद्री पर्वताच्या डोंगरदर्‍यांची, नद्या नाल्यांची आणि धरणांची खूप मोठी रांग दोनशे ते अडीचशे किलोमीटरच्या पुणे नाशिक या निसर्ग संपन्न पट्ट्याला लाभली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या प्रसिद्ध भीमाशंकर, अष्टविनायका पैकी ओझर आणि लेण्याद्री ही देवस्थाने, अवघ्या मराठी मनाचा मानबिंदू आणि आदरस्थान असलेला शिवजन्म स्थळ शिवनेरी किल्ला, निसर्ग संपन्न दाऱ्या घाट व माळशेज घाट, तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थान असलेले कळसूबाईचे शिखर याच सह्याद्रीच्या पट्ट्यात येते. मुंबई, नाशिक, नगर आणि पुणे या शहरांच्या चतुष्कोणाच्या बरोबर मध्यभागी असलेला हा सर्व परिसर जलद दळणवळणाच्या साधनां अभावी दुर्लक्षित आहे. ऊस व केळी ही पारंपारिक पिके घेणाऱ्या या हरित पट्ट्याला द्राक्ष, कांदा, टोमॅटो इ. नगदी पिकांना नवी मुंबई वाशी येथे पोचवण्यासाठी, पावसाळ्यात सतत पडणाऱ्या दरडींमुळे, माळशेज घाटासारख्या जवळच्या मार्ग ऐवजी १०० किलोमीटरचा ज्यादा वळसा घालून खंडाळा घाट मार्गे गेली ६० वर्षे जावे लागत आहे. पारनेर, जुन्नर, अकोले, आंबेगाव आणि मुरबाड या तालुक्यांना वरदान ठरू शकेल असा… नगर-मुंबई हा, या भागांची खूप वर्षांपासून मागणी होत असलेला लोहमार्ग सुद्धा असाच अदृश्य झाल्यासारखा दिसतो आहे.पुणे ते नाशिक हा पूर्वीचाच रेल्वे मार्ग ठेवून, ज्या ठिकाणी रेडिओ दुर्बिणींचे जाळे आहे.फक्त त्याच ठिकाणी पंधरा-वीस किलोमीटरचा पश्चिमेकडून वळसा घेऊन, निसर्ग संपन्न सह्याद्रीच्या कुशीतून हा रेल्वे मार्ग धावल्यास; शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण, मुलांची शिक्षणे, नोकरदारांचे जाणे येणे आणि पुणे ते नाशिक पर्यंतच्या सर्व तालुक्यांना पर्यटनासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. स्वतःच्या पायाजवळ पाहण्याच्या राजकारण्यांच्या राजकारणामुळे चाकण मध्ये रस्त्यांची, उड्डाणपूलांची व पुणे-नाशिक रस्ता वाहतुकीची प्रचंड वाट लागली आहे. पुणे ते नाशिक या संपूर्ण पट्ट्यातील सर्व राजकारण्यांनी जोर लावल्यास, त्यांनीच दाखवलेल्या दिवास्वप्नातून आणि वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून या रेल्वे मार्गाकडे नक्कीच पाहता येईल. तेव्हा.. पुणे-नाशिक रस्त्याला समांतर असाच हा रेल्वे मार्ग होऊ द्या, फक्त जीएमआरटी आहे त्या भागात वळण घेऊन, याच भागातून महाराष्ट्र व भारत सरकारची विकासाची रेल्वे जाऊ द्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे