गतिरोधक ठरतोय अपघातांना कारणीभूत
1 min read
आणे दि.१४:- जुन्नर तालुक्यातील मढ ते पेमदरा येथे कल्याण नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी गतिरोधक टाकले आहेत
परंतु हे डांबरी गतिरोधकाला पांढरे पट्टे न मारल्याने व गतिरोधक दर्शक फलक न लावल्याने या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या गतिरोधकामुळे अपघात कमी होणे ऐवजी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मंगळवार (दि. ७) अण्णासाहेब वाघिरे कॉलेजजवळ नव्याने टाकलेल्या गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आठवडाभरात येथे झालेला हा सहावा अपघात आहे.
अण्णासाहेब वाघिरे कॉलेजजवळ उभारलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. तेथे रिफ्लेक्टर तसेच सूचनाफलक लावलेला नसल्याने वारंवार अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने वेगात आलेली दुचाकी (एमएच १२ क्यू ३५८३) गतिरोधकावर आदळून रस्त्यालगतच्या खड्यात कोसळली.
या अपघातात दुचाकीस्वार दिनकर दशरथ कालेकर (वय ५८, रा. कुरकुटवाडी, बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हा जखमी झाला. तसेच समर्थ कॉलेज, बेल्हे, आणे, पेमदरा, ओतूर, खामुंडी येथेही अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्यावरती सूचनाफलक व गतिरोधकावरती पांढरे पट्टे मारण्याची मागणी आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते
पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, आणे उपसरपंच सुहास आहेर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, संतोष आहेर, माऊली संभेराव, पाटील गाडेकर, पेमदरा उपसरपंच बाळासाहेब दाते, नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी केली आहे.