ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्याल आळे येथे महामार्ग सुरक्षा पथकाची भेट; वाहतुकीच्या नियमांचे पालन करा – पो.उप.निरीक्षक अशोक पिंपळे
1 min read
आळेफाटा दि.१३:-रस्ता सुरक्षा अभियान २०२५ या केंद्र सरकारच्या आयोजित सुरक्षा सप्ताह २ जाने २०२५ ते १६ जाने २०२५ निमित्ताने महाविद्यालयास महामार्ग सुरक्षा पथकाने ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे (ता. जुन्नर) ला भेट दिली अशी माहिती ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी यांनी दिली. यावेळी पो. उ.नि प्र.अधिकारी महामार्ग सुरक्षा पथक अशोक पिंपळे, मा. सहा. फौजदार संदेश निघोट, दिलीप केंगले – पोलिस हवालदार व व मृत्युंजय दूत संदीप गाढवे हे उपस्थित होते. वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात अशोक पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वाहनांच्या वाढलेल्या प्रचंड संख्येमुळे व गतिमान जीवनामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. यात अनेक व्यक्तींचे बळी जात आहेत, कायमचे अपंगत्व येत आहे म्हणून केंद्र सरकारकडून रस्ता सुरक्षा प्रचार व प्रसारासाठी या सप्ताहाचे दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजन केले जाते.
आपल्या मार्गदर्शनात अशोक पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या मानवी चूकांमुळे अपघात होतात हे सविस्तरपणे सांगितले वाहनांचा जास्त वेग, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे या मानवी चुकांमुळे अपघात होतात. जास्त दूरपर्यंत सलग वाहन चालविल्यास मेंदूचे अवयवांवरील नियंत्रण कमी होते.
आणि आपले वाहनावरील नियंत्रण सुटते व ते अपघाताला कारण ठरते असे ते म्हणाले. दुचाकी वाहन चालविताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केला पाहिजे. रस्त्यावरील वाहतुकीच्या चिन्हांचा अर्थ समजून घेतला पाहिजे शीट बेल्ट लावले पाहिजेत वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळला पाहिजे.
प्रवास सुरू करण्यापूर्वी व वेळोवेळी वाहनांची तपासणी केली पाहिजे वाहनांची वेगमर्यादा तंतोतंत पाळली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करावी व पोलीस हेल्पलाइन नंबर 112 वर फोन करून अपघाताची माहिती पोलिसांना कळवावी असे ते म्हणाले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांडगे सर यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले तर दाभाडे मॅडम यांनी आभार मानले.