रेशनकार्डसाठी बनावट उत्पन्नाचे दाखले देणाऱ्यावर गुन्हा दाखल
1 min read
जुन्नर दि.१२:- रेशन कार्ड काढण्यासाठी बनावट उत्पन्नाचे दाखले देणाऱ्या एकावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी दिली. विनोद चंद्रकांत बिडवई (रा. शंकरपूरा पेठ, जुन्नर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत जुन्नरचे पुरवठा निरीक्षक अधिकारी ज्ञानेश विनोद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेली माहिती अशी की, ९ जानेवारीला पुरवठा विभाग एक महिला रेशन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे जमा केली. पुरवठा विभागाने हि कागदपत्रांची छाननी केली असता.
त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला नसल्याने संबंधित महिलेला उत्पन्नाचा दाखला घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने काही वेळाने उत्पन्नाचा दाखला पुरवठा विभागात जमा केला असता त्या दाखल्यावर तत्कालीन तहसीलदार रवींद्र सबनीस यांचे नाव व डिजिटल सही असल्याचे निदर्शनास आले.
त्या उत्पन्नाच्या दाखल्याची खातरजमा केली असता महा ऑनलाइनला तपासले असता हा दाखला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हा दाखला बनावट असल्याचा संशय आल्याने संबंधित महिलेकडे चौकशी केली असता त्यांनी हा दाखला रामकृष्ण हरी लॉटरी सेंटर शंकरपूरा पेठ, जुन्नर येथे विनोद बिडवई यांनी दिला.
असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या आदेशाने पुरवठा विभागाचे अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी निरीक्षण अधिकारी दीपक मडके व जुन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. मोरे पथकाने त्या ठिकाणी दोन बनावट ग्राहक पाठविले असता त्या ग्राहकाला बिडवई यांनी २० मिनिटात ४३ हजारांचा बनावट दाखला दिला.
या दिलेल्या दाखल्याची तपासणी केला असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्या ठकाणी पथकाने छापा टाकला असता विनोद बिडवई हे बनावट उत्पन्नाचे दाखले देत असल्याचे आढळून आले. यानंतर तेथे काही इसमाचे दाखले व बनावट दाखले बनविण्यास लागणारे संगणक, प्रिंटर, आणि सीपीयू ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.