किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर
1 min read
बेल्हे दि.१०:- महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व डिसेंट फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला, बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथे किशोरवयीन मुली तसेच महिला यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे करण्यात आले होते.याप्रसंगी बोरी खुर्द गावच्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली संभाजी काळे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बांगर, वानिता भोर व इतर महिला उपस्थित होत्या. जि.प.प्राथमिक शाळा आणि प्रशालेतील सर्व मुली व उपस्थित महिला यांना आरोग्य सेविका उज्वला गवळी यांनी जेंडर, आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींच्या समस्या, गैरसमज, मैत्रिणीकडून मिळणारे चुकीचे सल्ले याबद्दल माहिती दिली. लैंगिक व आरोग्य विषयी चुकीच्या मिळालेल्या माहितीमुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.अल्पवयीन मुले व मुली यांमध्ये निर्माण होणारे परस्पर आकर्षण व धोके, सामाजिक समस्या,
त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे प्रश्न याबद्दल सचित्र अशी सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद पुणे यांनी तयार केलेली मार्गदर्शन पुस्तिका मुलींना देण्यात आली.याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे समन्वयक योगेश वाकचौरे आणि अभिषेक चुरगुडे यांनी विशेष सहाय्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक पटेल यांनी केले तर मान्यवरांचे आभार उपशिक्षक चव्हाण यांनी मानले.