राज्यात एचएमपीव्ही व्हायरसचा शिरकाव? नागपुरात दोन मुलांना लागण; दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे
1 min read
नागपूर दि.८:- नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. दोन लहान मुलं एचएमपीव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. एक ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. ३ जानेवारीलाच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे. हे एचएमपीव्हीचे राज्यातील पहिले दोन रुग्ण आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. मात्र, दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करुन घेण्याची गरज भासली नाही. या दोघांनाही घरीच उपचार देण्यात आल्याची माहिती आहे.
दोन्ही मुलांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती आहे. भारतात सोमवारी (६ जानेवारी) मुलांमध्ये मानवी एचएमपीव्ही संसर्गाची सात प्रकरणं नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत असताना – बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि अहमदाबादमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितले की प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे कोविड सारखा उद्रेक होणार नाही.एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. तो २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला आणि तो अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे, असं नड्डा म्हणाले.
राजस्थानमधील डुंगरपूर येथील एका दोन महिन्यांच्या बालकाला २४ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात श्वसनाच्या आजाराने दाखल करण्यात आले होते आणि २६ डिसेंबर रोजी एचएमपीव्हीचे निदान झाले होते. नागपुरातील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ७ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांची मुलगी अशा दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.