नववर्षातील पहिल्याच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका;पड जमिनीसंदर्भात बैठकीत महत्त्वाचा निर्णय
1 min read
मुंबई दि.२:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची नव्या वर्षातील पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज गुरुवारी पार पडली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसंच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठीचे निकष शिथिल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १२ वाजता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबै बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.
मुंबै बँक ही भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे. तर शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. ज्या जिल्हा बँकांना सलग अ वर्ग आहे, त्यांना शासनाच्या व्यवहारांना परवानगी असते.
या निकषात मुंबई जिल्हा बँक येत असल्यामुळे आणि अनेक सरकारी योजनांना, उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत झाली आहे, असं दरेकरांनी सांगितलं.महसूल विभागाबाबत आजच्या मंत्रिमंडळत बैठकीत निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार असून त्याचा राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना होणार फायदा होणार आहे. राज्यातील ९६३ शेतकऱ्यांच्या ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या.
आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेत संपूर्ण ९६३ शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार असल्याचं स्पष्ट केलं असून रेडीरकनरच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.