जालन्यात क्रिकेट खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका; तरुणाचा जागीच मृत्यू
1 min read
जालना दि.३१:- सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. क्रिकेट खेळताना, लग्नात नाचताना तसेच बसल्या जागी तरुणांना हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवाव्या लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता अशीच एक मनाला चटका लावणारी घटना जालन्यात घडली आहे. क्रिकेट स्पर्धेदरम्यान ३२ वर्षीय तरुण मैदानावरच कोसळला. यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विजय पटेल असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबई जवळच्या नालासोपारा येथील आहे.हा तरुण फलंदाजी करत होता.
फलंदाजीसाठी ट्रान्स घ्यायला निघाला असतानाच तो खेळपट्टीवर स्टम्पच्या जवळच कोसळला. मैदानावरील इतर खेळाडू त्याच्याकडे धावले, मात्र तोपर्यंत विलंब झाला होता व तरुणाचा मृत्यू झाला होता. फलंदाजी करताना विजय अचानक खाली कोसळला तो परत उठलाच नाही. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमसनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यांमध्ये खेळत असताना विजय अचानक मैदानावर कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.विजय मैदानावर कोसळल्यानंतर आयोजकांनी त्याला जवळच्या दवाखान्यात नेले.
मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मैदानावर सिक्सर मारल्यानंतर सहकारी मित्रासोबत तो चर्चा करत होता. मात्र, त्यानंतर स्ट्राईक घेण्यासाठी जात असतानाच.
तो मध्येच कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान विजयचा मृत्यू नेमका कशाने झाला? याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी हार्ट अटॅकमुळे या खेळाडूचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.