अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा!

1 min read

मुंबई दि.३०:- बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच, धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये. अशा शब्दांत भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसह माळीचेही नाव घेत टिप्पणी केली होती. दरम्यान, आज तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन सादर केले.मुख्यमंत्री कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली. एक्स खात्यावरून फोटो पोस्ट करून म्हटलंय की,“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे