जयहिंद येथे राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची उत्साहात सुरुवात
1 min read
वार्ताहर दि.१९:- येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्राहक पंचायत संस्था पुणे,तालुका जुन्नर व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व तहसील कार्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. वस्तू आणि सेवेच्या आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये ग्राहक म्हणून टिकायचे असेल तर अधिक संघटितपणे, जागरूकता आणि चोखंदळपणाची गरज असल्याचे मत तहसीलदारांनी व्यक्त केले.
ग्राहक संरक्षण कायदा आणि या कायद्यातील ग्राहकाच्या सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तू निवडण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क अशा मूलभूत अधिकारांविषयी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,
ग्राहक पंचायत संस्थेचे सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नारायणगाव आगाराचे आगार व्यवस्थापक वसंत आरगडे, ग्राहक संस्था पुणे जिल्हा राज्य अध्यक्ष अशोक भोरडे, अरुण कुमार मोटे, योगेश शेंडे,
जुन्नरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, विस्तार अधिकारी शांताराम धेंडे, रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील गुंजाळ, जुन्नर वनअधिकारी रमेश खरमाळे तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश कुलकर्णी आणि जुन्नरचे पुरवठा निरीक्षण अधिकारी दीपक मडके यांनी केले. तर नियोजन प्रथम वर्ष समन्वयक प्रा.घोलप व्ही. जे. आणि प्रथम वर्षाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गाडेकर आर. ए. यांनी केले.