विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार; आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

1 min read

नागपूर दि.१६:- राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर, महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. त्यामुळे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याने आत्मविश्वास दुणावलेले सत्ताधारी विरुद्ध संख्येने कमी असलेले विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी अधिवेशनाच्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे ऐन थंडीत राजकारण चांगलंच तापणार आहे.विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरत आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी विधानभवनात आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, अशा घोषणा देत. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक होत प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची प्रतिकृती हातात घेऊन ईव्हीएम सरकार विरोधात लोकशाही वाचवा, ईव्हीएम हटवा,ईव्हीएम हटवा, देश वाचवा अशा जोरदार घोषणाबाजी केल्या.महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचं हे अधिवेशन आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील विदर्भासह जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. दरम्यान, या अधिवेशनात जवळपास 20 विधेयकं सादर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधकांसोबत चर्चेची तयारी असून त्यांच्या मुद्यांना उत्तरं देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या विषयांवर सभागृहात सविस्तर उत्तर देणार. आमची चर्चेची तयारी आहे.विरोधी पक्षाने सभागृहात चर्चा करावी, आम्ही त्यांचा आवाज दाबणार नाही. लोकसभेप्रमाणे पळ काढून मीडियासमोर बोलण्याचं काम करू नका, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. अवघे 47 आमदारांचे पाठबळ असलेल्या महाविकास आघाडीची 237 इतके संख्याबळ असलेल्या महायुतीसमोर आव्हान टिकवून ठेवण्याची कसोटी लागणार आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. परभणीत उसळलेला हिंसाचार, आंबेडकरी अनुयायींवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई, बीड जिल्ह्यात सरपंचाची झालेली हत्या, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू या घटनांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे