आजी-आजोबा नातवाच्या शाळेत खेळण्यात दंग; मॉडर्न मध्ये ‘एक दिवस आनंदाचा नातवंडांच्या शाळेतला’ उपक्रम

1 min read

बेल्हे दि.३:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘एक दिवस नातवंडांच्या शाळेत’ या उपक्रमांतर्गत आजी- आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व आजी-आजोबांचे स्वागत हे नातवंडांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध निवेदक उत्तम घोलप यांनी सर्व आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले. मुलात मूल होऊन सर्व आजी आजोबांनी या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. आपले वय, आजारपण, सर्व जबाबदारी विसरून सर्व आजी-आजोबा खेळ खेळण्यात दंग झाले. नातवंडांच्या बालपणात आपल्या मुलांचे बालपण शोधणारे आजी आजोबा या वेळी स्वतःच बालपणात रमले. आमच्या मुलांना शिक्षणासोबतच संस्कार देणारी शाळा म्हणजे मॉडर्न इंग्लिश स्कूल व आई-बाबांसोबत आजी आजोबा ही शाळेचा एक घटक मानल्याबद्दल आशालता पानसरे यांनी आजींनी शाळेचे आभार मानले. खरंतर आई-वडिलांपेक्षाही जास्त वेळ सोबत असणाऱ्या आजी-आजोबा व नातवंड या नात्याचे महत्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर आले तसेच आमचे बालपण पुन्हा एकदा आम्हालाअनुभवायला मिळाले याबद्दल जिजाबा गुंजाळ या आजोबांनी सर्व शिक्षक व प्राचार्य यांचे आभार मानले. या वेळी प्राचार्या विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे, शिक्षक विद्यार्थी, आजी- आजोबा उपस्थित होते. उपस्थित सर्व आजी आजोबांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे तसेच सर्व संचालक मंडळाने मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे