गावात शिवी देणाऱ्यांना होणार ५०० रुपयांचा दंड; सौंदाळा ग्रामपंचायतीचा निर्णय
1 min read
अहिल्यानगर दि.१:- रागाच्या भरात किंवा भांडण झालं की आधी शाद्बिक हल्ला होतो. भांडणाची सुरुवात ही शिव्या देऊनच होते. रस्त्यावर, ट्रेनमध्ये, घरात किंवा कुठेही भांडण झाले की तोंडून पहिल्या शिव्या बाहेर पडतात. भांडणात अनेकजण आई बहिणीवरुन शिव्या देतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात आई-बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.मारहाणीपेक्षा शब्दांचे घाव अधिक धारधार असतात. शिव्या देणं हे अपमानास्पद वागणूक देण्यासारखे आहे. भांडणात शिव्या दिल्यास लहान मुलांवर देखील याचा वाईट परिणाम होतो.
यामुळेच महाराष्ट्रातील सौंदाळा गावाने अपशब्द वापरणारे तसेच आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात नवा नियम लागू केला आहे. सौंदाळा गावचे सरपंच सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत याबाबत ठराव पारित केल्याची माहिती दिली. ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यात आला.
या नियमानुसार शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. महिलांच्या सन्मान आणि स्वाभिमानाच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या विरोधात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावानुसार जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे 500 दंड सक्तीने आकारण्यात येईल. शिव्या देताना आईचा आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयवासंदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो.
त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान केला असल्याचं सरपंचांनी स्पष्ट केलं आहे. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक धोरणात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली आहे.