नवरदेवाच्या दारुड्या मित्रांमुळे बोहल्यावर चढण्यापूर्वीच लग्न मोडले
1 min read
श्रीरामपूर दि.२७:- लग्नाच्या पूर्वसंध्येला हळदीच्या दिवशी वरपक्षाकडील नवरदेवाच्या मित्रमंडळींनी मदीरा प्राशन करून हळदी समारंभात डिजेच्या तालावर नाचत गदारोळ केला. त्यांनी केलेल्या या रंगीत पार्टीचे परिणाम प्रत्यक्षात लग्न मोडण्यात झाले. वधू पक्षाकडून अशा व्यसनी असलेल्या लोकांना मुलगी न देण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आल्याने बोहल्यावर चढण्याआधीच वराला घरचा रस्ता धरावा लागल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे नूकतीच घडली. याबाबतची माहीती अशी की, टाकळीभान येथील मुलीचा विवाह अहिल्यानगर येथील मुलाशी ठरला होता.
रीतीभातीप्रमाणे लग्न समारंभाचे सर्वच सोपस्कार यापूर्वीच पार पडले. मुला-मुलीची पसंती होऊन अखेर लग्नाचा शुभमूर्हतही ठरला. ठरल्याप्रमाणे वरासह वरपक्षाचे जवळील नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या हौशेने हळदीसाठी टाकळीभान येथे दाखल झाले.
हळदी समारंभ होऊन दुसऱ्या दिवशी नवरदेव बोहल्यावर उभा राहणारच होता. मात्र, त्या अगोदरच वरपक्षातील नातेवाईक व मित्रमंडळीने आपले गुण दाखवले. लग्नाच्या पूर्व संध्येलाच हळदीच्या दिवशी कुठलाही मुलाहीजा न बाळगता नवरदेवाच्या मित्रांनी यथेच्छ अशी दारू प्राशन केली.
दारूच्या नशेत हळदीच्या ठिकाणीच डिजेच्या तालावर जसे नाचता येईल तसे नाचत वरपक्षाकडील वराच्या मित्रांकडून धिंगाणा सुरू झाला. हा सर्व तमाशा हताश होऊन वधूपक्षाकडील लोक बघत होते. असा व्यसनाधीन मित्रपरिवार असलेल्या मुलाला मुलगी कशी द्यावी, असा यक्ष प्रश्न वधूपक्षाकडील लोकांसमोर उभा राहिला.
अखेर मुलगी न दिलेलीच बरी असा धाडसी निर्णय यावेळी वधूपक्षाकडील मंडळीनी घेऊन वराला बोहल्यावर चढण्याअगोदरच घरचा रस्ता दाखवला. आजमितीला समाजात व्यसनाधीनता वाढत चालली असून तरुण वर्ग या व्यसनांचे शिकार होत आहे.
कुठे काय करावे याची जराशीही पर्वा न करता वाहवत चाललेला तरुण या व्यसनाधीनतेने बरबाद होत आहे. अशा या व्यसनी मित्रपरिवार असलेल्या वराची निर्व्यसनी असल्याची खात्री कोण देईल?
संसाराची वेल फुलण्याआधीच ती कोमेजून जात असेल तर ते न झालेलेच बरे ! व येथेही तसेच झाले. अखेर वधूपक्षाकडील हुशारीने हा विवाह सोहळा हळदीच्या दिवशीच मोडला. या निर्णयाने वधूपक्षाकडील लोकांचे कौतूक होत आहे.