याचिका फेटाळली;असे विचार येतात कुठून?:- सर्वोच्च न्यायालय
1 min read
नवी दिल्ली दि.२७:-इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन मतदानासाठी न वापरता, पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जावे, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. ही जनहित याचिका डॉ. के. ए. पॉल यांनी दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की, तुम्हाला ही याचिका दाखल करण्याची कल्पना सुचली तरी कशी? जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जात नाही.
निवडणुका हरल्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याव्यतिरिक्त अनेक सूचना याचिकेत मागण्यात आल्या होत्या. निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे, दारू किंवा इतर प्रलोभन दिल्याबद्दल दोषी आढळल्यास किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देणे समाविष्ट आहे.
याचिकाकर्ते के.ए. पॉल यांनी आपण जनहित याचिका दाखल केल्याचे सांगितले तेव्हा खंडपीठाने म्हटले, तुमच्याकडे मनोरंजक जनहित याचिका आहेत.एवढ्या छान कल्पना तुम्हाला कुठून मिळाल्या? यावर याचिकाकर्त्याने सांगितले की, ते एका संस्थेचे अध्यक्ष आहेत.
ज्याने तीन लाखांहून अधिक अनाथ आणि ४० लाख विधवांना वाचवले आहे. त्यावर खंडपीठ म्हणाले, तुम्ही या राजकीय आखाड्यात का येत आहात ? तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे.
जेव्हा पॉलने सांगितले की, आपण १५० हुन अधिक देशांमध्ये गेलो आहे, तेव्हा खंडपीठाने त्यांना विचारले की मतदान बॅलेट पेपरद्वारे केले जाते की प्रत्येक देशात इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर केला जातो.