महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तणातणी; तुटेपर्यंत ताणायचे नाही:- उद्धव ठाकरे

1 min read

मुंबई, दि.१९:- महाविकास आघाडीत जागावाटपावरून तणातणी सुरू झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबुरीची भूमिका मांडली. तुटेपर्यंत ताणायचे नाही, असा सल्ला त्यांनी मित्रपक्षांना दिला. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही अॅक्शन मोडमध्ये येत फोनाफोनी करून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्याविषयीचा प्रश्न उद्धव यांना विचारण्यात आला. जागा वाटपावेळी खेचाखेची होत असते. पण, तुटेपर्यंत ताणायचे नाही हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आघाडीचे जागावाटप लवकरच निश्चित होईल, असे ते उत्तरले. काँग्रेस आणि ठाकरे गटातील मतभेद विकोपाला जाऊ नयेत यासाठी पवार यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पटोले हे जागा वाटपाच्या चर्चेला उपस्थित असतील तर ठाकरे गट चर्चेला येणार नसल्याचे राऊतांकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती होती. यासह ठाकरे गटाने पटोलेंची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठांना केल्याचीही माहिती होती. जागा वाटपात विदर्भातील जागांबाबत पटोले हे अडवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर रंगली. त्यातच पटोले या संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पोहोचले. त्यामुळे आता मविआत जागा वाटपाचा वाद पेटला आहे, असे वाटत असताना ठाकरे गटाने संयमी भूमिका घेतली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे