जयहिंद शैक्षणिक संकुलाचा वर्धापन दिन संपन्न

1 min read

नारायणगांव दि.१८:- विद्यार्थ्यांना संकट व संधी दोन्ही आयुष्यात येत असतात पण संकटावर मात करून संधीचे सोने केले तरच आयुष्यात यश प्राप्त करता येते. आपल्यामधील क्षमतेची जाणीव ही आयुष्यात संकट अथवा संधी आल्यानंतरच होते.

विद्यार्थी म्हणून अभ्यासाबरोबरच उपलब्ध संधी शोधून त्याचा परिपुर्ण लाभ घ्यावा, असे मत प्रसिध्द साहित्यिक व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. कुरण येथील जयहिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्युटचा वर्धापन दिन व शिवनेरभूषण शिक्षणमहर्षी स्व. तात्या गुंजाळ यांचे पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या प्रसंगी ’आमचे भविष्य आमच्या हाती’ या विषयावर डॉ. कळमकर यांचे व्याख्यान झाले.

यावेळी “स्व. तात्या गुंजाळ स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कर्जुले हर्या गावचे वै. विष्णू पाटीलबा शिंदे यांना त्यांच्या निस्वार्थ समाजसेवा तसेच धार्मिक, शैक्षणिक व बॅकिंग अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. वै. शिंदे हे त्यांच्या साधी राहणी व उच्च विचारसरणी करिता पंचक्रोशीत ओळखले जात असत.

तसेच त्यांनी ग्रामीण भागातील तरूणांना व्यवसाय उभे करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या पत्नी वेणूबाई व मुलगा संतोष शिंदे यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. हा पुरस्कार स्व. तात्यासाहेबांचे बंधू रावजी गुंजाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

जयहिंद शैक्षणिक संकुलाची स्थापना स्व. तात्या गुंजाळ यांनी २७ वर्षापुर्वी केली. कुरणच्या माळरानावर आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आज या शैक्षणिक संकुलात के.जी. ते पी.जी. पर्यंतचे अभ्यासक्रम या शैक्षणिक संकुलात शिकवले जात आहेत. पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, फार्मसी, आय.टी.आय.,

एम.बी.ए.,एम.सी.ए.,बी.सी.ए, इंग्लिश मेडीयम स्कुल व ज्यु. कॉलेज अशा शाखा चालवल्या जात आहेत. या सर्व शाखांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव विजय गुंजाळ यांनी दिली. पुरस्काराचा स्विकार केल्यानंतर स्व. तात्यासाहेबांच्या कार्याची उंची खुप मोठी आहे.

काही असामान्य व्यक्तिमत्वच इतिहास घडवत असतात. पुण्यतिथी व जयंती सर्वांची केली जात नाही. हे कार्यक्रम म्हणजे असामान्य कर्तृत्वाचे केलेले स्मरण होय, असे मत श्री हरेश्वर विद्यालय कर्जुले हर्याचे मुख्याध्यापक मधुकर बर्वे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जितेंद्र गुंजाळ होते. तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब दांगट, खजिनदार धर्मेंद्र गुंजाळ, तसेच विष्णू पाटीलबा शिंदे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ठकाशेठ वाफारे, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हेमंत महाजन यांनी केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दत्तात्रय गल्हे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे