उद्या २६ जुलै शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

1 min read

पुणे दि.२५:- पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.

मात्र, अश्यातच हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळा उद्या दि. 26 जुलै रोजी बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. असा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे. त्यामुळे घाटमाथा वघळता इतर ठिकाणच्या शाळा सुरू राहतील.

आदेशात म्हटले आहे की, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार दिनांक २५ जुलै २०२४ व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे. तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे.

त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी,

सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे.

तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे